Monday, 18 November 2013

                                                   भीमाशंकर (Bhimashankar)


किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

            

                          भीमाशंकर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक ज्योर्तिलिंग आहे. हे सुमारे साडेतीन हजार फूट उंचीवर , दाट वनश्रीत वसलेले एक पवित्र, पूरातन देवस्थान आहे. भीमाशंकरचा आजुबाजूचा प्रदेश हा अतिशय घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्र सरकारने हा भाग "भिमाशंकर अभयारण्य" म्हणुन घोषित केलेला आहे. या जंगलात राक्षसी खार / उड्णारी खार म्ह्णजेच शेकरु पाहायला मिळते. तसेच पावसाळ्यात येथील जंगलात अंधारात चमकणारी "ज्योतिवंती" ही वनस्पती पाहायला मिळते. झाडाच्या सालीवर जमा झालेल्या बुरशीमुळे ही वनस्पती अंधारात चमकते. सर्व डोंगरप्रेमींचा तसेच नविन भट्क्यांचा भीमाशंकर हा आवडता ट्रेक आहे. 


  पहाण्याची ठिकाणे :
१) मंदिर :-
भीमाशंकरचे मंदिर १२०० ते १४०० वर्षापूर्वीचे असून, त्याची बांधणी हेमाडपंथी पद्धतीचे आहे, मंदिराच्या छतावर आणि खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिराच्या बाह्यभागात सिंहासनाधिष्ठीत देवता व त्यांवर छत्रचामर ढाळणारे त्यांचे सेवक यांच्या मूर्ती आढळून येतात. देवळा समोरच १७२९ सालातील धातूची एक प्रचंड घंटा लटकवलेली आहे.ही पोर्तुगिज बनावटीची घंटा, चिमाजी आप्पांनी वसई वरील विजया नंतर भिमाशंकर मंदिराला अर्पण केली. मंदिराच्या आवारात ५ ते २० फूट उंचीची दीपमाळ आहे, या दीपमाळेवर एक शिलालेख आढळतो. भीमा नदीचा उगम याच भीमाशंकरच्या डोंगरावर आहे. 


२) नागफणीचे टोक :-
घाटाच्या रस्त्याने वर आल्यावर एक तळे लागते. या तळ्याच्या उजव्या बाजूने वर जाणारी वाट आपल्याला हनुमान मंदिराकडे घेऊन जाते. मंदिरावरून सरळ वर जाणार्‍या वाटेने आपण नागफणीच्या टोकापाशी येऊन पोहोचतो. येथून समोरच उभा असणारा पेठचा किल्ला, पदरचा किल्ला, पेब आणि माथेरानचे पठार दिसते. या निसर्गसौंदर्याच्या दालनातून बाहेर पडताना निसर्गावर नितांत प्रेम करणाया समर्थांच्या ओळी आठवतात. 


३) गुप्त भीमाशंकर :- 
राम मंदिराच्या डाव्या बाजूने एक पाण्याची वाट खाली उतरते. या वाटेने सरळ गेल्यास आपण घनदाट जंगलात प्रवेश करतो. पुढे २५ मिनिटानंतर एक मंदिर लागते. या मंदिरापासून डावी कडे उतरणारी वाट आपणांस पाण्यामुळे तयार झालेल्या पिंडी कडे घेऊन जाते. यालाच गुप्त भीमाशंकर असे म्हणतात. पावसाळ्यात येथे फार मोठा धबधबा तयार होतो. 


पोहोचण्याच्या वाटा :
  गडावर जाण्याच्या वाटा : 

भीमाशंकरला जाण्यासाठी मुंबईहून कर्जतला यावे.पुणेकरांनी स्वारगेटवरून एसटी अथवा ट्रेनने कर्जत गाठावे. कर्जतहून खांडस या गावी यावे.खांडस ते कर्जत सुमारे १४ कि.मी चे अंतर आहे. कर्जतहून खांडसला बसने अथवा रिक्षेने जाण्याची सोय आहे. खांडस गावातून शिडी घाट , गुगळ घाट आणि गणेश घाट या दोन्ही वाटांनी भीमाशंकर गाठता येते.



१) गणेश घाट :- 
खांडस गावातून दोन किमी अंतरावर एक पूल लागतो. या पुलापासून उजवीकडे जाणारी कच्च्या रस्त्याची वाट गणेश घाटाची आहे. ही वाट अत्यंत सोपी आहे. या वाटेने तासभराच्या अंतरावर एक गणेशाचे मंदिर लागते. या वाटेने वर जाण्यास ६ ते ७ तास लागतात. 

२) शिडी घाट :- 
पुलाच्या डावीकडे जाणारा रस्ता आपणास खांडस गावात घेऊन जातो. गावातून विहिरीच्या डाव्या बाजूने जाणारी वाट ही शिडी घाटाची आहे. ही वाट सर्व वाटांमध्ये अवघड आहे. पावसाळ्यात ही वाट फारच निसरडी होत जाते.या वाटेने दीड तासांत ३ शिड्या लागतात. तिसर्‍या शिडी नंतर अर्ध्या तासात एक वाडी लागते. या वाडी मध्ये ‘पुंडलिक हंडे’ यांचे घर आहे. वाडी पासून वर चढत गेल्यावर एक झाप लागते. या ठिकाणी गणेश आणि शिडी घाटातील वाटा एकत्र येतात. येथे चहापाण्याची चांगली सोय होते. इथून पुढे दीड तासांत आपण एका तळ्यापाशी पोहचतो. या तळ्यापासून डावीकडे जाणारी वाट आपल्याला मंदिराकडे घेऊन जाते.

३) गुगळ घाट :- 
हि वाट धबधब्यातून जाणारी वाट आहे.पुढे ही वाट व गणेश आणि शिडी घाटातील वाटा एकत्र येतात. या वाटेने शिडी घाटा एवढाच वेळ लागतो. ही वाट फारशी प्रचलित नसल्याने वाटाड्या बरोबर न्यावा लागतो.

४) अहुपे घाट :-
कल्याण - मुरबाड मार्गे- देहरी - खोपवली या गावात पोहोचावे. हे अहुपे घाटाच्या पायथ्याचे गाव आहे. येथुन ३ ते ४ तासात घाट पार करुन आपण अहुपे गावात पोहोचतो.अहुपे गावाच्या मागे भट्टीचे रान आहे. या रानातून जाणारी वाट ८ कि.मी.वरील कोंढवळ गावापर्यंत जाते. येथुन बसने किंवा चालत ८ कि.मी.वरील भीमाशंकरला जाता येते. (अहुपे गाव - कोंढवळ - भीमाशंकर अंतर अंदाजे १६ कि.मी.) 

५)वाहनांची वाट :- 
भीमाशंकरला जाण्यासाठी वर गावापर्यंत डांबरी सडक बांधलेली आहे. या साठी मुंबई अथवा पुणे येथुन, तळेगाव - चाकण - घोडेगाव मार्गे भीमाशंकरला (अंतर अंदाजे २६५ कि.मी.) जाता येते. 




राहाण्याची सोय :
भीमाशंकर गावा बाहेर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे हॉटेल आहे. गावात घरगुती पण महागडी अशी रहाण्याची सोय होते. पावसाळ्यात मात्र रहाण्याची गैरसोय होते. 
जेवणाची सोय :
भीमाशंकरला जेवणासाठी हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय :
विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गणेश घाट ६ ते ७ तास आणि शिडी घाट व गुगळ घाट ४ तास लागतात.
सूचना :
गणेश घाट सोपा आहे. शिडी घाट कठीण आहे, अनुभवी मार्गदर्शक बरोबर असल्या शिवाय या घाटाने जाऊ नये.
















































No comments:

Post a Comment